प्रेक्षणीय स्थळे

 

यात्रा - दिग्रस मधील घंटी बाबाची यात्रा व वणी येथील श्री रंगनाथ स्वामी यांची यात्रा ह्या दोन यात्रा जिल्हातील महत्वाच्या म्हणता येतील. त्याच प्रमाणे कळंब च्या श्री चिंतामणीची यात्रा, घाटंजीची मारोती महाराज यात्रा, व जोम्भोरा माहूर येथील श्री दत्त जयंती उत्सव हे सुधा तेवढ्याच थाटात साज-या केल्या जातात. तसेच पुसद, महागाव येथील महाशिवरात्री उत्सव सुद्धा पाहण्या सारखा असतो. यात्रेमध्ये शेजारच्या ठिकाणचे व्यापारी व दुकानदार आपली दुकाने आवर्जून थाटतात. यामध्ये मोठ्याप्रमाणात अन्न धान्य, दैनंदिन वापरासाठीची भांडीकुंडी, शेतीला लागणारे अवजारे इत्यादि वस्तूंची विक्री केल्या जाते. लोक यात्रेमध्ये आपल्याला आवश्यक ते सामान मोठ्या प्रमाणात येथे खरेदी करतात. श्री रंगनाथ स्वामीची यात्रा हि गायी-बैलांच्या खरेदी विक्री साठी खूप प्रसिद्ध आहे.

ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे - किल्ले, जुनी मंदिरे, यात्रा व सहलीची ठिकाणे ह्या सर्व गोष्टी जिल्ह्याचा आर्थिक व सामाजिक विकास घडविण्यात मोलाचे योगदान देतात. जिल्ह्यात प्रेक्षणीय स्थळांच्या दृष्टीकोनातून असा कोणताही ऐतिहासिक किल्ला नाही. काही मंदिरे व सुंदरश्या वनराईने नटलेली सहलीची ठिकाणे हे मात्र भाविकांना व यात्रेकरूना नेहमी आकर्षित करतात. निरंजन माहूर, अंजी (घाटंजी) येथील नृसिंहाचे मंदिर, जोडमोहा येथील खटेश्वर महाराजांचे मंदिर इत्यादी काही महत्वाची ठिकाणे जिल्ह्यात पहावयास मिळतात. पैनगंगेच्या तीरी असलेले कापेश्वर येथील गरम पाण्याचे झरे हे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत असतात

कळंब येथील श्री चिंतामणी गणेश मंदिर - पौराणिक पार्श्वभूमी असलेले हे ठिकाण नागपूर-यवतमाळ महा मार्गावर वसलेले आहे. या ठिकाणी श्री चिंतामणी गणेशाचे मंदिर जमिनी खाली विशिष्ट स्वरुपात आढळून येते. या ठिकाणी प्रसिद्ध असे गणेश-कुंड सुद्धा पाहता येईल. चक्रावती नदीच्या तीरावर वसलेले हे ठिकाण गणेश भाविकांसाठी नेहमीच जागृत राहिले आहे. माघ-शुद्ध महिन्यामध्ये चतुर्थी पासून सप्तमी पर्यंत येथे श्री चिंतामणीची मोठी यात्रा भरते.

वणी - तहसील मुख्यालय असलेले वणी हे शहर निर्गुडा नदीच्या तीरावर वसलेले आहे. श्री रंगनाथ स्वामींचे प्रसिद्ध असे मंदिर येथे आहे. हजारो भाविक फाल्गुन ते चैत्र शुद्ध १५ या दरम्यान मंदिरात दर्शनाला येतात. वणी हे शहर जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी केंद्रापैकी एक आहे. येथे गुरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. शहराच्या आजूबाजूला दगडी कोळशांच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे हे शहर रस्ते व लोहमार्गानी इतर शहरांची व्यवस्थितरीत्या जोडल्या गेले आहे.

यवतमाळ - जिल्हा मुख्यालय असेलेले जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील कापूस हे महत्वाचे पिक असल्यामुळे त्याची प्रचंड बाजारपेठ येथे आहे. कापसावर आधारित उद्दोग जसे कापूस संकलन केंद्रे, जिनिंग फॅक्टरीज, सूतगिरण्या इ. येथे पहावयास मिळतात. रेमंड समूहाच्या कापड उद्दोगाशी संबधित मोठा प्रकल्प येथे आहे. तेल व डाळीच्या घाणी, लाकूड कटाई यंत्रे इ. शहरात आढळतात. शैक्षणिक सुविधा जसे वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, मुले / मुलींकरिता तंत्रनिकेतन संस्था/महाविद्यालये, शारीरिक शिक्षण महाविद्यालये, शहरात उपलब्द आहेत. जगत मंदिर व खोजा मस्जिद सुद्धा शहरातील महात्व्वाच्या ठिकाणांमध्ये गणल्या जाते.

आर्णी - अरुणावती नदीच्या तीरावर वसलेले हे शहर असून या ठिकाणी बाबा कंबलपोष यांची मोठी यात्रा (उर्स-शरीफ) भरते. मुस्लीम बांधव मोठ्या थाटात हा उत्सव साजरा करतात. तीन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. ह्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीची उलाढाल होते. विविध ठिकाणाहून आलेले फिरते चित्रपट गृहे, सर्कस, नाना प्रकारचे आकाश पाळणे इत्यादी मनोरंजनाच्या साधनांमुळे अबाल वृद्धा करिता पर्वणीच ठरते. मिठाईचे व खेळण्यांचे बरेच दुकाने येथे थाटल्या जातात. हिंदू-मुस्लीम व इतर धर्मीय या ठिकाणी येवून दर्ग्यावर चादर चढवितात व आशीर्वाद घेतात. राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन आवर्जून या ठिकाणी पहावयास मिळते.